मुंबई : करोनाचे नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव मोठया उत्साहात व शांततेत पार पडला. मुंबईतील ७३ नैसर्गिक स्‍थळे आणि १७३ कृत्रिम तलावांमध्ये  सुमारे १ लाख ५८ हजार २२९ श्री गणेशमूर्तींचे व ६ हजार ५३२ हरतालिका / गौरी मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले आहे. यानुसार एकूण १ लाख ६४ हजार ७६१ मुर्त्यांचे विसर्जन श्रीगणेशोत्सव काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी ७९ हजार १२९ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्‍ये करण्‍यात आले आहे.  तर उर्वरित ८५ हजार ६३२ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यात आले आहे.

कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या ७९ हजार १२९ मुर्त्यांपैकी ७५ हजार ६८७ या घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या. तर उर्वरित ३ हजार ५०२ गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. त्यामुळे कृत्रिम विसर्जन स्थळी मुर्त्यांचे विसर्जन करण्यास मुंबईकरांनी लक्षणीय प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८२ हजार ३३९ एवढ्या गणेशमूर्ती होत्या, तर ३ हजार २९३ एवढ्या हरतालिका / गौरी मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ८२ हजार ३३९ गणेशमूर्तीपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर ४ हजार ५२५ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्य.

गणेशोत्‍सवामध्‍ये मुंबईकरांच्‍या सेवेसाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्‍यक ती सर्व यंत्रणा उभी केली होती. ७३ नैसर्गिक व १७३ कृत्रि‍म तलावांच्‍या ठिकाणी मूर्ती संकलन करुन विसर्जनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. विविध चौपाट्यांवरील भुसभुशीत रेतीमध्ये वाहन फसू नये यासाठी ५८७ स्‍टील प्‍लेटची व्यवस्था करुन तात्पुरते वाहनमार्ग तयार करण्यात आले होते. तर ७१५ जीवरक्षक अहोरात्र तैनात राहण्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे २५ हजार कामगार – कर्मचारी – अधिकारी हे देखील कर्तव्यार्थ उपस्थित होते.या व्यतिरिक्त मुंबईकरांच्या सुविधेसाठी ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍थाही करण्‍यात आली होती. विविध ठिकाणी सरंक्षण कठडयांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्था देखील आवश्यकतेनुसार करण्‍यात आली होती.

निर्माल्य संकलन व खतनिर्मिती
मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने सर्व स्थळांवरील निर्माल्य संकलित करण्याचे कामकाज त्‍वरेने पूर्ण केले. दिनांक १० ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधी दरम्यान एकूण २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले. या संकलित करण्यात आलेल्या विविध ३८ ठिकाणी या निर्माल्‍यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात आली आहे व करण्यात येत आहे. यानुसार बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा, फुले, हार इत्यादींच्या निर्माल्यापासून तयार करण्यात येणा-या खताचा उपयोग हा प्रामुख्याने महापालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *