नाशिक महानगरपालिका क्षेत्र प्रभारी’ पदी ॲड. धनराज वंजारी यांच्यावर जबाबदारी

नाशिक, प्रतिनिधी : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना सत्तानाट्यानंतर होऊ घातलेल्या या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजधानी दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन केलेली ‘आम आदमी पार्टी’ देखील यासाठी सज्ज झाली असून राज्यात संघटना वाढीसाठी पक्षश्रेष्ठींकडून विभागनिहाय विशेष नेतृत्वाची निवड केली जात आहे. त्या अनुषंगाने ‘नाशिक महानगरपालिका क्षेत्र प्रभारी’ पदी ‘आप’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. धनराज वंजारी यांची नियुक्ती केल्याची घोषणा पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली.

नियुक्तीनंतर प्रथमच एक दिवसीय दौऱ्यावर असलेल्या वंजारी यांनी रविवारी नाशिक येथील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीला संबोधित केले. पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे, संघटना वाढीवर भर देणे यासह प्रभागनिहाय योग्य उमेदवारांची निवड करणे, प्रभागांचा सखोल अभ्यास करणे यांसारख्या इतर महत्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी, पार्टीचे नाशिक प्रदेश समन्वयक जलबीर सिंह, नाशिक प्रभारी गिरीश उगाळे, प्रभाकर वायचळे, योगेश कापसे, राजेंद्र गायधनी यांसह अन्य पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) येथे ‘आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी’ म्हणून व नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामगिरीचा दांडगा अनुभव असलेल्या ॲड. धनराज वंजारी यांना भारत सरकारचा ‘एक्स्पर्ट डिटेक्टीव्ह -१९८६’ विशेष पुरस्कार, युनोचे आंतरराष्ट्रीय पोलीस पदक – २००१, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक – २००३ व महाराष्ट्र राज्याचे पोलीस सन्मान चिन्ह – २००४ असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१८ साली राजकारणात प्रवेश करून ॲड. धनराज वंजारी यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपा व कॉंग्रेस नंतर बीएसपीला मागे टाकत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाले. ॲड. धनराज वंजारी यांची नियुक्ती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *