*वनमंत्र्यांचा 23 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतींशी “महा ई संवाद”*

*हरित महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहन*

मुंबई  (अजय निक्ते) :  हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह “महा ई संवाद” साधणार आहेत.  राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी श्री. मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे   www. parthlive .com  या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.

हरित महाराष्ट्राच्या निर्धाराने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला. या वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात २०१७ साली  ४ कोटी वृक्षलागवडीच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या वृक्षलागवडीची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.  २०१८ साली १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागून पूर्णतवाला गेला. या वृक्षलागवडीत राज्यातील ३६ लाख लोक सहभागी झाले आणि वृक्षलागवड हा केवळ शासनाचा उपक्रम न राहाता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दृष्टिपथात आले.

यावर्षी २०१९ च्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. हे वृक्षधनुष्य पेलतांना कालपर्यंत राज्यात २७ कोटी ६८ लाख वृक्षलागवड झाली आहे. साधारणत: ७८ लाखांहून अधिक लोकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या निर्धारित कालावधीत राज्यात लागणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवडीचा अर्ध्याहून अधिक टप्पा जुलै अखेरपर्यंतच पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्यात केलेला ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १ कोटीपेक्षा अधिक लोकांच्या सहभागातून पूर्णत्वाला जाईल आणि संकल्पापेक्षा राज्यात अधिक वृक्षलागवड होईल असा विश्वास वनमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संपन्न वन हे समृद्ध महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. यासाठीच आपण थेट गावपातळीवर ग्रामपंचायतींशी संवाद साधून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हाक देणार आहोत असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *