
डोंबिवली एमआयडीसी (MIDC) फेज वन परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. ऐरोसेल गारमेंट कंपनीत अचानक भीषण आग लागली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या भयानक ज्वाळा आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट दूरवरून स्पष्टपणे दिसत होते, त्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. सध्या चार ते पाच अग्निशामक गाड्या घटनास्थळी असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.स्थानिक पोलिसांनीही वेळीच हस्तक्षेप करत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी तत्काळ नागरिकांना घटनास्थळापासून दूर हटवले आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एमआयडीसी परिसर सील करण्यात आल्याची माहिती आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कुठल्या कारणामुळे, याचा तपास सुरू आहे. मात्र, गारमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणावर कापड व इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने काहीच वेळात रौद्ररूप धारण केले. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.या घटनेमुळे एमआयडीसीमधील इतर उद्योगधंद्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू असून, घटनेच्या सखोल चौकशीसाठी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.
