
डोंबिवली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा डोंबिवली पूर्वेत उभारण्यात यावा या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीने धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष भुजंग कांबळे यांनी केले. आंदोलनात रिपब्लिकन पार्टीचे माणिक उघडे, कामगार संघटनेचे लक्ष्मण मिसाळ, समितीचे उपाध्यक्ष महादेव साळवे, सचिव सालिकराम दाढेल, खजिनदार साईनाथ घुले यांच्यासह अनेक अण्णाभाऊ साठे प्रेमी सहभागी झाले होते.डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. तमाम मांतग समाज, अण्णाभाऊ साठे साहित्यप्रेमी आणि बहुजन समाजाच्या वतीने शासनाकडे पुतळा उभारण्याची ठाम मागणी करण्यात आली. शासनाने जर या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
