डोंबिवली म्हाडाच्या कोकण मंडळाची मोठी घर लॉटरी योजना आजपासून सुरू झाली असून, यंदा सर्वसामान्यांसोबतच राजकीय लोकप्रतिनिधींनाही प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेत प्रथमच आमदार आणि खासदारांसाठी तब्बल ९५ घरं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या योजनेकडे राजकीय आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष वेधलं जात आहे.कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये यंदा एकूण ५,३६२ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसामान्य, आर्थिक दुर्बल घटक, निम्न व मध्यम उत्पन्न गटासाठी घरं तर आहेतच, पण पहिल्यांदाच आमदार-खासदारांसाठी वेगळ्या राखीव घरांची तरतूद करण्यात आली आहे.यामध्ये कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील एका घराची सर्वाधिक चर्चा होत आहे. गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘शुभम मोनोलीत’ या प्रकल्पातील बाराव्या मजल्यावरील सदनिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फ्लॅटची किंमत केवळ ९ लाख ५५ हजार ८०० रुपये इतकी असून, इतक्या कमी दरात मिळणाऱ्या या फ्लॅटबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.५५० स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटमध्ये हॉल, किचन, बेडरूम आणि दोन गॅलरीचा समावेश आहे. घराची रचना आधुनिक असून, विशेषत: अल्प उत्पन्नधारक लोकप्रतिनिधींसाठी असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कोण ‘अल्प उत्पन्नधारक आमदार-खासदार’ म्हणून या घरासाठी पात्र ठरणार? हेच खरे आकर्षण ठरत आहे.दरम्यान, सर्वसामान्यांसाठीदेखील कमी दरात घरं उपलब्ध करून देण्याचा दावा म्हाडाकडून केला जात असला तरी, या योजनेतील राजकीय आरक्षणामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे. कल्याणसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पांवर आता सर्वसामान्यांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *