
डोंबिवली, दि. 15 (प्रतिनिधी)-
कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३८ शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात अपयश आल्यामुळे शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय जाधव यांनी मे महिन्यातच ६१ मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. “शाळा परिसरातील अपड्रॉप विद्यार्थी, झोपडपट्टीत राहणारे व शिक्षणापासून वंचित असलेले मुले यांना पुन्हा शाळेत आणा,” असे आवाहन त्यांनी मुख्याध्यापकांना केले होते. शाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला असताना उपायुक्त जाधव यांनी महापालिकेच्या ६१ शाळांचा आढावा घेतला. त्यात काही मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रयत्न करून विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, तर काही शाळांनी एकही नवीन विद्यार्थी प्रवेशित केलेला नाही. याच कारणामुळे ३८ शाळांतील मुख्याध्यापकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाला यापूर्वी स्वतंत्र उपायुक्त नव्हता. संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे. बिल्डिंग ,चाळ वा झोपडपट्टी असो, विद्यार्थ्यांना चांगले शालेय वातावरण मिळावे, दर्जेदार शिक्षण दिले जावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत.महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, वह्या, पुस्तके वेळेत दिली जात आहेत. विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. या सर्व गोष्टींचा प्रचार करून विद्यार्थी संख्या वाढविण्याचे काम मुख्याध्यापकांनी करायला हवे, असे उपायुक्त जाधव यांचे म्हणणे आहे. पूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज मात्र ही संख्या सुमारे ८५०० पर्यंत घसरली आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त जाधव यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शाळांचे चित्र बदलण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.

कोट :-
“महापालिका शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पटसंख्या वाढवावी अशी सूचना केली होती. मात्र काही शाळांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात अपयश आल्यामुळे ३८ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.”
— संजय जाधव, उपायुक्त (शिक्षण विभाग), कल्याण-डोंबिवली महापालिका
