
डोंबिवली, दि. 14 (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाने मद्य विक्रीवरील करात केलेल्या वाढीविरोधात राज्यभरातील हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी आज (14 जुलै) एक दिवसीय बंद पुकारला. या आंदोलनात सुमारे 22,000 हॉटेल्स आणि बार्स सहभागी झाले असून, कल्याण-डोंबिवलीतील सर्व बार आणि हॉटेल्सही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
हॉटेल ओनर्स असोसिएशन डोंबिवलीने सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला असून, वाढीव कर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आज डोंबिवलीतील मॉडर्न प्राईड हॉटेल येथे संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि याबाबतचे निवेदन सरकारला देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले.

राज्य सरकारने अलीकडेच मद्यावरील व्हॅट (VAT) ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर नेले,परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली,भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केली आहे.ही वाढ अचानक झाल्यामुळे बार आणि हॉटेल व्यावसायिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे बार्स बंद होण्याची शक्यता असून, रोजगारांवरही याचा प्रतिकूल परिणाम होईल, अशी भीती हॉटेल ओनर्स असोसिएशन डोंबिवलीचे सेक्रेटरी सत्येश शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
परमिट रूम आणि वाईन शॉपवरील करात तफावत असल्यामुळे ग्राहक ढाब्यांवर, चायनीज गाड्यांवर किंवा उघड्यावर मद्य सेवन करण्याकडे वळतील, असा इशारा हॉटेल व्यवसायिक गिरीश शेट्टी यांनी दिला. यामुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि शासनालाही अपेक्षित महसूल मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.या बैठकीस अध्यक्ष अजित शेट्टी, सेक्रेटरी सत्येश शेट्टी, प्रभाकर शेट्टी, सूकुमार नायक, राजू भंडारी, सुकेश शेट्टी, किशोर शेट्टी, विठ्ठल शेट्टी, वीजीत शेट्टी, सचिन शेट्टी यांच्यासह डोंबिवली व कल्याण परिसरातील अनेक हॉटेल आणि बार मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरकारने हा वाढीव कर रद्द करावा, अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा हॉटेल ओनर्स असोसिएशनने दिला आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार आहे.
