टाकू नका कचऱ्यात औषधे; पर्यावरण रक्षणासाठी ‘टेकबॅक’ उपक्रमाची कल्याणातून सुरुवात!”

डोंबिवली – “शपथ घेऊ या, मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांमुळे होणारी पर्यावरण हानी टाळू या!” – असा संदेश देत अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या हस्ते ‘टेकबॅक’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कल्याण येथून करण्यात आला.

गुरुवारी (10 जुलै) कल्याणमधील केमिस्ट भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘पर्यावरण वाचवूया – औषधांचा गैरवापर टाळूया!’ या संकल्पनेतून औषधांच्या गैरवापरामुळे होणारे प्रदूषण थांबवण्याच्या उद्देशाने ‘टेकबॅक’ उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली.

या उपक्रमाअंतर्गत मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेली औषधे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ग्राहकांनी ती स्थानिक केमिस्टकडे जमा करावीत, अशी विनंती करण्यात आली. यासाठी प्रत्येक मेडिकल दुकानात ‘ग्रीन ड्रॉप बॉक्स’ ठेवण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मे 2025 मध्ये राज्यांच्या औषध नियंत्रकांना अशा औषधांच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे.

पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष शिंदे म्हणाले की, ऑक्टोबर 2024 मध्ये हा उपक्रम कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातून सुरू करण्यात आला होता. आता त्याचा विस्तार संपूर्ण राज्यभर करण्यात येत असून, ठाणे जिल्ह्यातून ही मोहीम पुढे नेली जाणार आहे. औषधे गटारीत किंवा कचऱ्यात टाकण्यामुळे होणारे जलप्रदूषण आणि आरोग्यधोके टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

कल्याण शहरातील सुमारे 800 व ठाणे जिल्ह्यातील 5000 औषध दुकाने या उपक्रमात सहभागी होणार आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करतानाच, संघटनेने प्रत्येक ग्राहकाला जबाबदारीने औषध विल्हेवाटीची भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष देशमुख, सचिव व इतर पदाधिकारी, पर्यावरण विषयावर लेखन करणाऱ्या प्राध्यापिका मंजिरी घरत, सागर कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *