
डोंबिवली | सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत महिलांच्या लोकल डब्यात पुन्हा एकदा तुफान गोंधळ आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे. डोंबिवली स्थानकातून सकाळी 8:20 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकींच्या झिंज्या ओढत, शिवीगाळ करत महिलांनी एकमेकींना बेदम मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यामुळे रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे.ही घटना नुकत्याच विरार लोकलमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर घडली आहे. विरार लोकलमध्ये एका महिलेला इतक्या जोरात मारहाण करण्यात आली होती की तिच्या चेहऱ्यावरून रक्त निघालं होतं. अशा घटनांची सततची पुनरावृत्ती पाहता आता प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी लता आरगडे यांनी स्पष्टपणे म्हटले की, “महिला डब्यांची संख्या वाढवावी, डब्यांमध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था असावी, तसेच महिला गार्ड, पोलीस बंदोबस्त यावर भर द्यावा.” त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला आमदारांनी या प्रश्नावर आवाज उठवावा, अशीही मागणी त्यांनी केली.महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ भांडणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सर्वसामान्य प्रवाशांचीही मागणी आहे.दररोज लाखो महिला प्रवासी लोकलने प्रवास करतात. अशा घटनांमुळे त्यांचं प्रवास करणं अधिक धोकादायक होत आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ सुरक्षा व्यवस्थेचा न राहता, तो महिलांच्या मूलभूत हक्कांचा बनला आहे.
