कल्याण – केडीएमसीच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी सिंडिकेट परिसरातील शाळा क्र. 95/8 (उर्दू शाळा), बारावे येथील शाळा क्र. 68 आणि बारदान गल्लीतील उर्दू व मराठी शाळेला भेट देत, थेट विद्यार्थ्यांमध्ये बसून पायाभूत चाचणीची पाहणी केली. विशेष म्हणजे, आयुक्त गोयल यांनी खडू हातात घेत थेट वर्गात शिकवणी केली आणि सराव परीक्षेबाबत मार्गदर्शन दिले.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्त गोयल यांच्या सूचनेनुसार शिक्षणव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोहीम उघडली आहे. यावर्षी शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, दफ्तरे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी केडीएमसीने शाळा स्तरावर पायाभूत चाचण्या सुरू केल्या असून, प्रत्येक शाळेसाठी ‘पालक अधिकारी’ नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी संबंधित शाळेत जाऊन चाचणी प्रक्रिया तपासणार आहेत.

आयुक्त गोयल यांच्या ‘प्रत्यक्ष सहभागातून परिवर्तन’ या भूमिकेचा अनुभव घेत शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक भारावले. लवकरच सर्व शिक्षकांसाठी विशेष शिक्षण परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवे उपाय आणि कृती आराखडे निश्चित करण्यात येणार आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *