जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

डोंबिवली, ता. १४ (प्रतिनिधी)

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आज विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नेमणुकांमध्ये शिवसेनेच्या कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी निलेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली, तर विधानसभा प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.

   महायुतीचे उमेदवार असलेल्या पक्षाचा विरोध करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे महेश गायकवाड यांच्या निलंबनानंतर शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख पद रिक्त होते. विधानसभा निवडणुकीचे अंतिम टप्पे जवळ येत असल्याने या पदाला तात्काळ नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.

    या नियुक्त्यांमध्ये निलेश शिंदे यांना शहरप्रमुख, प्रशांत काळे यांना विधानसभा प्रमुख, कृष्णा साळुंखे यांना उप शहरप्रमुख, राजाराम आव्हाड यांना उपविभाग प्रमुख, आणि संतोष गवारे यांना उप शाखाप्रमुख म्हणून नेमण्यात आले. या सर्वांना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

   तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोंबिवलीतील सभेत उद्धव शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे, आणि अनंत आंब्रे यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पक्षात सन्मानपूर्वक सामावून घेतले.

    या नियुक्त्या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, अरुण आशान, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी, माजी नगरसेविका माधुरी काळे तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अपेक्षांनुसार हे सर्व पदाधिकारी पक्षाच्या कार्यात योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!