कल्याण दि.12 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत असून राज्यभरात दिग्गजांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या 13 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) येथे सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे.राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेचे विद्यमान आमदार यांनी अनेक मोठ मोठी विकासकामे आणि भरीव निधी मंजूर करून आणला आहे. या सर्व विकासकामांचा उहापोह करण्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांचाही खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे.