दिक्षाभूमी ते विधानभवन असा काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

नागपूर : राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे सुपर मुख्यमंत्री म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. सरकारने मदत केली तर मग ती गेली कुठे? राज्यात भिषण पाणीटंचाई आहे, एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदी उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली घडवण्यात देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तिसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजपा म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तिसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करता मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण तूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *