कल्याण / प्रतिनिधी : कल्याण डोंबिवलीमध्ये नविन घर खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये नविन घर घेणाऱ्या ग्राहकांकडून ‘झिरो स्टॅम्प ड्युटी’ आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे. 31ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून एमसीएचआय क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिटने पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.

बांधकाम क्षेत्रामध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि ग्राहकांना नविन घर खरेदीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने ६ टक्के असणारी स्टॅम्प ड्युटी थेट अर्ध्यावर म्हणजेच ३ टक्के आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटने त्या ही पुढचे पाऊल टाकत ग्राहकांकडून ‘शून्य स्टॅम्प ड्युटी’ घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा एमसीएचआय चे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली. एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या ५० नामांकित व्यावसायिकांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आजमितीला कल्याण डोंबिवलीमध्ये ७५ हून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू असून त्यामध्ये परवडणाऱ्या घरांपासून अगदी आलिशान लक्झरी घरांचा समावेश आहे. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचेही शितोळे यांनी सांगितले.

एमसीएचआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना खूपच मोठा दिलासा मिळणार आहे. घरखरेदी करणाऱ्या किंवा खरेदीच्या विचारात असणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून त्याचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ उठवण्याचे आवाहन माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी यावेळी केले.यावेळी एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटचे सचिव विकास जैन यांच्यासह माही अध्यक्ष दिपक मेहता, जोहर झोजवाला, अमित सोनावणे आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!