कर्जत दि.१५. राहुल देशमुख : जल जीवन मिशनच्या माध्यमातून शासनाने गाव पाणीदार करत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला असा प्रचार करण्यास सुरुवात केली. मात्र प्रत्यक्षात चित्र यापेक्षा वेगळे असल्याचे कर्जत तालुक्यात समोर आले आहे. तालुक्यातील चाफेवाडी येथील १ गाव ५ वाड्यांसाठी झालेली जल जीवन मिशन भर उन्हाळ्यात आटल्याने योजनेचा बोजवारा उडाला आहे. तर पाण्यासाठी पुन्हा महिलांना डोक्यावर हांडे घेऊन नदीमध्ये खड्डे खणून त्यातुन पाणी जमा करावे लागत असल्याचे भयाण वास्तव आहे. दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देखील हतबल झाले आहे.

कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाच्या झळांसोबत आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे. तालुक्यात शासनाच्या जल जीवन मिशनचे काम काही भागात पूर्ण झाल्याने त्या वाडयांचा विचार यंदा पाणी टंचाई कृती आराखड्यात केलेला नाही. मात्र उन्हाळाच्या सुरुवातीलाच जल जिरवण मिशनचे उद्भव कोरडे पडल्याने ग्रामस्थांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.


तालुक्यातील चाफेवाडी या महसुली गावाच्या हद्दीतील ५ वाड्यांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ६९ लाख रुपयांची योजना मंजूर झाली झाली होती. यामध्ये चाफेवाडीसह मेंगाळवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, पादीरवाडी व शाळेचीवाडी असा वाड्यांचा समावेश आहे. तर डिसेंबर २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश मिळालेला या योजनेचे काम जून २०२३ मध्ये पूर्ण देखील झाले. गावात नळ आले. ग्रामस्थांना पावसाळ्यात घरपोच पाणी देखील मिळाले. पण ऐन उन्हाळ्याच्या काळात या योजनेचा उद्भव आटल्याने एका वडील देखील पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता बाजूच्याच कोरड्या ठाक असलेल्या पोशीर नदीवर खड्डे करून त्यात मिळणारे कळशीभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागत आहे.


दरम्यान पाणी योजना असताना देखील जर कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन जर आयुष्य कंठावे लागणार असेल तर योजना फक्त नावालाच का ? असा जळजळीत प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
कोणीही निवडून या पण आम्हाला पाणी द्या अशी आर्त हाक ग्रामस्थ घालताना दिसत आहेत. तेव्हा कोरड्या शासकीय योजनांना खराखुरा पाझर फुटणार तरी केव्हा या प्रश्नाला अद्यापतरी प्रतिक्षेची किनार आहे.


“गेल्यावर्षी आमदार महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत या नेत्यांनी पाण्याचे टँकर आणि बोअरवेल लाऊन दिल्याने काही प्रमाणात वाड्यांची तहान भागली होती.”

चाफेवाडी येथे जल जीवन मिशनची उद्भव विहीर घेताना आम्ही भुजल सर्वेक्षण विभागाची मदत घेऊनच उद्भव विहिरी घेतल्या होत्या. मात्र आता बहुतेक विहरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे योजनांना पाणी मिळत नसल्याचे समजते. वरिष्ठांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. : अनिल मेटकरी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कर्जत

गावात पाणी योजना आल्यावर आम्हाला वाटले कि आता गावात सुजलाम सुफलाम होईल. मात्र आम्हाला फक्त दोनच महिने पाणी मिळालं. त्यानंतर गावात नळ फक्त नावालाच आहेत. उन्हाळ्यात आम्हाला पुन्हा नदीवरच जाऊन पाणी भरायचं असेल तर मग लाखो रुपयांची हि योजना कात फक्त नावालाच आहे का ? नेते फक्त मत मागायला येतात त्यांना हि परिस्थिती दिसत नाही का ? : संगीता हिंदोळा, ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!