पालघर : राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असतानाच, पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  उष्माघातामुळं   एका  १६ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.  पालघरच्या विक्रमगड मधील केव वेडगेपाडा येथील अश्विनी विनोद रावते असं या मुलीचे नाव आहे. अश्विनी एस.पी.मराठे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मनोर येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती.

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून ठाणे पालघरसह आजूबाजूच्या जिल्हयात पारा चाळीशी पार गेला आहे. सोमवारी अश्विनी ही ११ वीच्या परीक्षेचा पेपर देऊन सोमवारी अश्विनी घरी आली. परंतु घरी कोणी नसल्यामुळे ती आई वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली. मात्र आई शेतावरून कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती आणि वडील मनोर येथे बाजारात गेले होते. अश्विनी शेतावर गेली असता तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. दुपारच्या सुमारास शेतात कोणीच नसल्यामुळे तब्बल दोन तास अश्विनी उन्हातच पडून होती. त्यानंतर आई घरी आल्यानंतर अश्विनीची कॉलेजची बॅग दिसली.

मात्र अश्विनी कुठे दिसत नाही हे पाहून अश्विनीची आई तिला शोधण्यासाठी पुन्हा शेतावर गेली. तेव्हा अश्विनी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर अश्विनीला तत्काळ मनोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अश्विनीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. 

सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून विक्रमगड तालुक्यामध्ये सोमवारी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्या सूर्य आग ओकत आहे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून दुपारच्या सुमारास पारा चाळीसच्या पार जात आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!