मुंबई : माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरले आहेत सवाल शिवतारे यांनी उपस्थित केला. बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलं. विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार विरूध्द विजय शिवतारे असा वाद पून्हा चव्हाटयावर आला आहे.
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीत राहून त्यांच्याच नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. बारामती लोकसभेची जागा महायुतीत शिवसेनेला देण्यात यावी आणि त्यातही ती उमेदवारी मलाच देण्यात यावी, असा हट्टच शिवतारे यांच्याकडून करण्यात येत आहे. पण महायुतीकडून त्यांचा नावाचा विचारही करण्यात येत नसल्याने शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. याचबाबत बोलण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना त्यांच्या बंगल्यावर बोलावले. त्यांच्यामध्ये साधारणतः दीड तास चर्चा झाली. परंतु, या नंतरही शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करण्याचे सोडले नसून बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
अजित पवारांवर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार म्हणाले होते विजय शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. अजित पवारांना माझा आवाका किती हे सांगतो. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो. अशी टीका करणारे अजित पवार आता एवढे का तडपडतात. दरम्यान, विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांनी मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे.”
युतीधर्म पाळा , मुख्यमंत्र्यांची सूचना
बारामतीमध्ये युतीधर्म पाळा असे संकेत मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिले असल्याचं विजय शिवतारे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या 40 वर्षांमध्ये अजित पवारांना विरोध करणारा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना माझ्या उमेदवारीची उत्सुकता आहे. अजित पवार निवडून येणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचं काहीही होवो, आपण त्यामध्ये पडू नये.