डोंबिवली : भाड्याने रिक्षा चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पोटाची खळगी भरण्यासाठी चोरलेली रिक्षा नादुरुस्त झाल्याने रिक्षावाल्याने पुन्हा दुसरी रिक्षा चोरली. त्या रिक्षावर दुसरा नंबर टाकला. रिक्षाचा नंबर चुकीचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तात्काळ या रिक्षा चालकाला अटक केली. बबलू पवार (38, रा. नामदेव म्हात्रे चाळ, भालगाव, कल्याण मलंगगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. चोरी केलेल्या रिक्षाचा नंबर बदलून तो दररोज भाल ते कल्याण-मलंगगड मार्गावर रिक्षा चालवत होता. त्यातून मिळणाऱ्या कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे गोरक्ष शेकडे यांना एका दक्ष रहिवाशाने फोन करुन माहिती दिली की, एक रिक्षाचालक कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या रूणवाल गार्डन समोर भाडे घेण्यासाठी थांबला आहे. त्याच्या रिक्षाचा नंबर चुकीचा आहे. त्याने ही रिक्षा चोरली असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचचे हवा. दत्ताराम भोसले, गुरूनाथ जरग आणि मिथून राठोड हे तिघे मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेवर पोहोचले. त्याठिकाणी एम एच 05/डी जी/2289 क्रमांकाची रिक्षा उभी होती. रिक्षाचालक बबलू पवार याच्याकडे रिक्षाचे कागदपत्रे दाखविण्यास सांगितले असता त्याच्याकडे रिक्षाची कागदपत्रे नव्हती. सखोल चौकशी केली असता बबलू याने ही रिक्षा कळव्यातून चोरल्याची कबुली दिली. सदर रिक्षावर खाेटा नंबर टाकला. इतकेच नाही तर यापूर्वी एक रिक्षा चोरली होती. ती रिक्षा खराब झाली आहे. मला पत्नी, मुले आहे. अन्य व्यक्तीच्या रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करतो. दररोज त्याला भाडे द्यावे लागत होते. मला काही पैसे वाचत नव्हते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? या विवंचनेत होतो. म्हणून मी रिक्षा चोरीचा पर्याच निवडला. उल्हासनगरातील एक रिक्षा चोरी केली. ती रिक्षा देखील खराब झाली. म्हणून मी दुसरी रिक्षा चोरल्याचे बबलूने सांगितले. या प्रकरणी क्राईम ब्रँचने बबलूचा ताबा सविस्तर माहितीसह हिललाईन पोलिसांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!