मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले, लोकल वाहतूक संथगतीने

मुंबई : मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. मुसळधार पावसाने धावणा-या मुंबईचा वेग मंदावला. पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने लोकल ट्रेनची वाहतूक अतिशय संथगतीने सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
पावसाचा जोर कायम असल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यातच आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा होण्याची शक्यता कमीच आहे. हिंदमाता, परेल, कुर्ला, दादरमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचप्रमाणे हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे. वांद्रे लिकिंग रोड, एसव्ही रोड, जेव्हीएलआर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)वर काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती आहे. अंधेरी सबवे, दहिसर सबवे आणि खार सबवेत पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंधेरी स्टेशनजवळही पाणी साचलं आहे. मिलन सबवेत पाणी साचल्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पावसामुळे मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मनमाडमधून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वे गाड्या दोन स्टेशन्सदरम्यान बराच वेळ थांबत आहे. रेल्वे सेवा अतिशय रडतखडत सुरु असल्याने मुंबईचा वेग मंदावला आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!