मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या शुक्रवार २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. देशातील ८९ मतदार संघात मतदान होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघ आणि राज्यात हायहोल्टेज ठरलेल्या अमरावतीमध्ये उद्या मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्याने आत दुस-या टप्प्यातील मतदानात वाढ होते का ? हे पाहावे लागणार आहे.
देशभरात जोरदार प्रचार आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांवर तुफान आरोप प्रत्यारोप केले. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या शांततेत मतदान होण्यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशातील १३ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर उद्या मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील सर्वच २० लोकसभा जागांवर मतदान होईल. कर्नाटकमधील १४, राजस्थानमधील १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, पश्चिम बंगालमधील ३ तर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.