मुंबई :  अभिनेता सलमान खानच्या  घराबाहेर आज (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 पहाटेच्या सुमारास दोन बाईकस्वारांनी  सलमान खानच्या घराबाहेर चार राऊंड फायर केले. यानंतर ते दोघेही फरार झाले. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट टाकून याचा उल्लेख केला आहे.

“सलमान खान, तुला आमची ताकद दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास दोन बाईकस्वारांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला याप्रकरणी सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ही दुर्दैवी घटना आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. 

गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता. सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, “सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. मी सलमान खानशीही बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!