मुंबई : महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी त्यांना दीड ते पावणे दोन वर्षांपूर्वीच तडीपार केले. जनतेनेही तडीपार केले, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, “काल एक शब्द बंद झाला. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो. पहिला हिंदुहृदयसम्राट जीभ कचरायची आता तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हा शब्द रद्द झाला. यावरून लक्षात आलं की, बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका सोडल्याने आम्हाला त्यांना सोडावे लागले आणि बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन करावे लागले. त्यामुळे अबकी बार तडीपार..असे म्हणाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी त्यांना दीड ते पावणे दोन वर्षांपूर्वीच तडीपार केले. जनतेनेही तडीपार केले. त्यामुळे इतर राज्यातून तडीपार इथे आले ते पंतप्रधान मोदींना कसे काय तडीपार करू शकतात”, अशीही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

“कालचा दिवस काळा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरंतर, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्यात आम्हाला बसावं लागतंय तर उबाठाच्या लोकांनी तिकडे जाऊन माफी मागायला पाहिजे होती. स्टॅलीन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्यांच्याबरोबर बसायला लागतं आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे होते”, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!