घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांची दादागिरी:   वाहनाच्या  काचा फोडल्या

पटेल अपार्टमेंट मधील रहिवाशी भयभीत

घाटकोपर ( निलेश मोरे ) : पश्चिम येथील खोत लेन रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांनी संपूर्ण रस्ता व्यापला असून फेरीवाले याच रोडवरील खाजगी अपार्टमेंटच्या जागा देखील व्यापत असल्याचे चित्र आज घाटकोपर येथे घडलेल्या घटनेनंतर दिसून आले . पटेल अपार्टमेंटच्या क्रॉस लेन गल्लीत फेरीवाले आपले दुचाकी वाहने दादागिरी करून अनधिकृत पणे उभी करत आहे . रविवारी  पटेल अपार्टमेंट मधील रहिवाशी पवन छेडा हे आपली अल्टा हे चार चाकी वाहन गेट मधून बाहेर काढत असताना त्यांच्या वाहनाची फेरीवाल्याच्या दुचाकीला धडक बसल्याने  फेरीवाल्याने रागाने पवन छेडा यांच्यासह या वाहनात असणाऱ्या महिलेला शिवीगाळ करत वाहनावर चढून काचा फोडल्या . यामध्ये छेडा यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले . फेरीवाल्यांच्या या दादागिरी नंतर पटेल अपार्टमेंट मधील रहिवाशी भयभीत झाले आहेत . याबाबतीत अशी माहिती मिळते की पटेल अपार्टमेंटच्या गेटवर अनेक वर्षांपासून बस्तान टाकून बसलेले फेरीवाले आपले दुचाकी वाहने उभी करत असल्याने येथील राहिवाशाना त्याचा त्रास होतो यावर रहिवाशांनी वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन व पालिकेला तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रहिवाशानी सांगितले . पालिका आणि पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने  त्याचा परिणाम आज आम्हालाच भोगावा लागला अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केली.  पोलिसांनी वाहनांचे नुकसान करणाऱ्या फेरीवाल्याला ताब्यात घेतले . मात्र फेरीवाल्यांच्या या उन्मातपणामुळे येथील रहिवाशी खूपच भयभीत झाले असून कायमस्वरूपी या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे .

One thought on “घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांची दादागिरी:   वाहनाच्या  काचा फोडल्या”
  1. फेरीवाल्यांचा हा मुजोर पणा किती काळ सहन करायचा हे प्रत्येक जनतेने ठरवावे राज साहेब ठाकरे बोलतात ते बरोबर आहे नाहीतर हे फेरीवाले आपल्या डोक्यावर चढून बसतील तेव्हा रडायची पाळी येईल आताच आवर घालावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *