मध्यरात्री, पहाटे, रांग लावूनही कूपन संपले कसे ? नागरिकांचा सवाल
कल्याण : १५ ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी सर्वच लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडालीय.. मध्यरात्री, पहाटे पासून रांगा लावूनही लोकांना कुपन मिळालं नाही त्यामुळे कल्याणात नागरिकांनी संताप व्यक्त केला. कुपनचा काळाबाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला.एका तरुणीने पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी शेकडो नागरिक काल रात्रीपासून तर काही जण पहाटेपासून रांगेत उभे होते. ही रांग सुमारे दिड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठी होती. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक सर्वच वयोगटातील नागरिक रांगेत उभे होते. मात्र मध्यरात्री, पहाटे रांग लावलेल्या नागरिकांना कुपन संपल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांचा रोष अनावर झाला.
‘ त्या ‘ तरुणीने धारेवार धरले…
सोनाली पाठारे ही तरुणी लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभी होती, मात्र तिलाही टोकन न मिळाल्याने ती संतापली. तिने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, कुपन वाटण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत एवढ्या लवकर कुपन कसे काय संपले असा संतप्त सवाल उपस्थित केला.
पोलीस धावले, प्रशासन बेफिकीर …
अखेर नागरिकांचा संताप पाहता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालिका मुख्यालयातून केडीएमसीचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित नव्हता. सगळा गोंधळ शांत झाल्यावर आणि गर्दी ओसरल्यावर मग पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यापूढे आता केडीएमसीचा एक अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे उपायुक्त डॉ भागवत यांनी सांगितले.