आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय
तातडीची सर्व मदत पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

रत्नागिरी दि. 25 :- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका महिलेने मुख्यमंत्रयासमोर टाहो फोडला. साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका असा विनवणी केली. यावेळी मुख्यमंत्रयांनी त्यांना धीर देत दिलासा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचं सांत्वन केले. बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दोन तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा

मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडे-लत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले.

पूर्ण आढावा घेतल्यानंतरच केंद्राकडून आर्थिक मदतीची मागणी
केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे. पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत होते.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!