डोंबिवली : दुकानदारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पैसे घेवुन त्यांना लुटणा-या एका भामटयास विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. गिरीष वामन गायकर (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याला कल्याण कोर्टाने चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत आतापर्यंत त्याने अनेकांना गंडविले आहे.
कल्याण-शिळ मार्गावरील गोलवली गावात राहणारा गरीष गायकर याने आतापर्यंत चौघांना फसविल्याचे उजेडात आले आहे. गुरुवारी 22 जुलै रोजी दुपारी ३:४० च्या सुमारास गिरीष याने सुभाष रोडला असलेल्या ग्लोबल मेडीकल स्टोअरमध्ये गेला. तेथील कर्मचा-यांना खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्याकडून 2 हजार रुपये घेवून पसार झाला. त्याच्याविरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने फरार आरोपी गिरीष गायकर याला डोंबिवली पश्चिम येथुन ताब्यात घेतले. चौकशीअंती गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहा पोलीस आयुक्त जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश बडणे, पाटणकर, नाईक, कांगुणे, महाजन यांनी यशस्वीपणे पार पाडली.