ठाणे : अतिवृष्टीमुळे शहरातील विविध रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा दिले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात विविध ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.
या पाहणी दौ-यामध्ये माळवी यांनी माजीवडा मानपाडा प्रभाग समिती, तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, सेवा रस्ता लुईसवाडी, एलबीएस मार्ग आणि इतर ठिकाणांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसेच कामाची गती व दर्जा या विषयी अभियंत्यांना सूचना दिल्या. दरम्यान ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या नागला बंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटर तसेच गावदेवी पार्किंग कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी पाहणी केली. विसर्जन घाट व दशक्रिया केंद्राचे काम ५ सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.