ठाणे (प्रतिनिधी)- संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानाने सांगितलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ तत्वाचा विसर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड   यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना संविधानाची प्रत तसेच प्रास्ताविकेची लॅमिनेट प्रत पोस्टाने पाठविली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून “ हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?” असा सवाल राज्यपालांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे शहराच्या मुख्य टपाल कार्यालयात एकत्र येत ‘संविधानाचा विजय असो’, अशा घोषणा देऊन राज्यपालांना संविधानाची प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठविली.

यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आम्ही भारतीय संविधान सविनय सादर करीत आहोत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. कदाचित त्यांना या संविधानाचा विसर पडला असेल की काय, म्हणूनच आम्ही भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविका त्यांना पाठवत आहोत. भारत हे धर्माधिष्ठीत राष्ट्र नसून धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हे सांगण्यासाठीच त्यांना संविधानाची प्रत आदरयुक्त सादर करीत असून त्यांनी हे वाचावे आणि संविधानात काय म्हटले आहे, हे त्यांनी पुन्हा पुन्हा उजळणी करावी. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, सरचिटणीस रवींद्र पालव, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, निलेश फडतरे, निलेश कदम, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष राजू चापले, वॉर्ड अध्यक्ष संतोष घोणे, दिनेश सोनकांबळे, समाधान माने, युवक पदाधिकारी सौरभ वर्तक, रोहित भंडारी, महिला पदाधिकारी माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, माया केसरकर, सोमा दे, नंदिनी चंदनशिव आदी उपस्थित होते.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!