पालघर ; लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने गावी परतण्यासाठी टोकनची प्रतीक्षा करणाऱ्या एका मजुराला पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणाची दखल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे, याप्रकरणी तहसीलदार शिंदे यांची अपर जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्फत रीतसर चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन आठवड्यात चौकशीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे मारकुट्या तहसीलदारावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागलंय.
लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील मजुरांसाठी पालघर स्थानकातून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्यासाठी आर्यन स्कूलच्या मैदानात मजुरांना टोकन देण्यात येत होते. टोकन घेण्यासाठी गेलेल्या एका मजुराला पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेसचे प्रदेश सचिव व पालघरचे निरीक्षक संतोष केणे यांनी या प्रकरणी तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तहसीलदार शिंदे यांची रीतसर चौकशी करून, चौकशीचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. *****