डोंबिवली / प्रतिनिधी ;  ‘लव्ह, प्यार और धोका’ या हिंदी चित्रपटासारखी एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. प्रियकराने एका 34 वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. शिवाय त्याने प्रेयसीकडून 10 लाख 20 हजार रुपयांची रोकड, 6 तोळे सोन्याचे दागिने व 95 हजार रूपये किंमतीच्या मोटरसायकल घेऊन फरार झालाय. 

एलमुल सुदाम असे दगाबाज प्रियकराचे नाव आहे. तर पेंदीनी असे या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मामाचे नाव आहे. पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात दगाबाज प्रियकर व त्याच्या मामा विरोधात अत्याचारासह फसवणुकीची फिर्याद दाखल केली असून फरार  मामा-भाच्याच्या तपासासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.  

पीडित तरुणी डोंबिवली पूर्वेत राहत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. दोन वर्षांपूर्वी एलमुल याच्यासोबत तिची ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून  त्याने डोंबिवली पूर्वेतील अभिनव शाळेजवळ असलेल्या समर्थ साई मोनार्च या इमारतीतील घरात तसेच मूळ गाव असलेल्या ओडिसा राज्यातील शरदापूर येथेही घरात आणि लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जुलै 2018 ते जानेवारी 2020 दरम्यान त्याने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार तर केलाच, शिवाय तिच्याकडून 10 लाख 20 हजारांची रोकड, 6 तोळे सोन्याचे दागिने व 95 हजार किंमतीची एक मोटरसायकलही बळकावली.

गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीने एलमुल याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र  प्रियकराने लग्न करण्यास नकार देऊन शिवाय तिला ठार मारण्याची धमकी दिली. या फसवणूककांडात, तसेच तिला धमकी दिल्याच्या गुन्ह्यात मामाही सहभाग असल्याने पीडितेने बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज प्रियकर व त्याच्या मामा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 376 (2) (एन), 420, 406, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी फौजदार डी. पी. जाधव आणि त्यांचे पथक एलमुल सुदाम आणि पेंदीनी या फरार मामा-भाच्याचा शोध घेत आहेत.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!