ठाणे शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो मनसेच्या वतीने नगरअभियंतांना सादर…

ठाणे (प्रतिनिधी): ठाणे शहरातील खराब रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाच महिन्यापूर्वीच साडेतीन कोटींची निविदा काढली होती. पण महापालिकेचे काम आणि सहा महिने थांब या उक्तीप्रमाणेचे गेल्या सहा महिन्यात शहरातील खड्डे बुजविण्याचे काम केले गेलेच नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो नगर अभियतांना सादर करत, ठाणेकरांना होणाऱ्या खड्डयांच्या समस्यांचा पाढा वाचला.

ठाणे शहरातील उड्डाणपुल, रस्त्यावर आणि सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्ष्ररश: चाळण झाली आहे. रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरू असलेले काम आणि या मार्गवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे ठाणेकरांना सध्या खराब रस्ते आणि वाहतूककोंडी असा दुहेरी समस्यांचा सामाना करावा लागत आहे. शहरातील मीनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमागृह आणि नौपाडा परिसरातील असे तीन उड्डाणपुला बरोबरच माजीवाडा ते आनंदनगर या घोडबंदर मार्गासह ठाण्यातील पूर्वद्रूतगती महामार्गसह मुंबई नाशिक महामार्गावर तसेच हावरे सिटी, वर्तक नगर, वागळे इस्टेट, कासेल मिल, गोकुळ नगर, वृंदावन सोसायटी, लोकमान्य नगर पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दरवर्षी ठाणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या कामांना गतीही दिली जात नसल्याचे वास्तव आहे. अखेर मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी नगरअभियंता रविंद्र खडते यांना शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो देत याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.
…….

पेव्हर ब्लॉक बसवित न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन :
या मार्गावरील उड्डाणपुलावर तसेच मुख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उच्च् न्यायालयाने पेव्हर ब्लॉक बसविण्यास बंदी केली असतानाही महापालिका या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या पेव्हर ब्लॉकमुळे रस्त्यावर पुन्हा गॅप निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!