
नाणार प्रकल्प : सरकारची डोकेदुखी वाढली, मुख्यमंत्रयाची कोंडी !
मुंबई / संतोष गायकवाड : रत्नागिरी जिल्हयातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दर्शविला असतानाच आज नाणारवासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेने नाणारवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहलीय. नाणार प्रकल्पाला स्वाभिमानचे सर्वेसर्वा आणि खासदार नारायण राणे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही या विरोधात दंड थोपटल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच कोंडीत सापडलेत.
काय आहेत राजकीय पक्षाच्या भूमिका
मनसे नाणारवासियांची पाठीशी
नाणारवासियांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेनेही नाणारवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिलय. सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास मनसे रस्त्यावर उतरले असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिलाय.
काँग्रेस स्थानिकांसोबतच : अशोक चव्हाण
रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारने प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबत असून काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ १९ एप्रिल पासून नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधणार असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.आज अशोक दादा वालम यांच्या नेतृत्वाखालील कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली.
शिवसेना प्रकल्प होऊ देणार नाही : उध्दव ठाकरे
दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारवर टीका केलीय. मुख्यमंत्री फितूर झाल्याची टीका करीत शिवसेना हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरे यांनी घेतलीय.
कोकणात प्रकल्प कदापि नाही, राणेंनी ठणकावले
स्वाभिमान संघटनेचे सर्वेसर्वा आणि भाजपकडून नुकतेच खासदार झालेले नारायण राणे यांनीही प्रकल्पाला विरोध केलाय. आमदार नितेश राणे यांनीही आज प्रकल्पाला विरोध दर्शविला. कुणी कितीही एमओयू करू देत पण नाणार प्रकल्प होणार नाही. कोकण सोडून कुठेही प्रकल्प करा असेही राणे यांनी ठणकावून सांगितलं.
प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये : शरद पवार
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे परिसरातील गावे तसेच शेतीचे मोठे नुकसान होणार असल्यास त्याची जागा बदलली जाऊ शकते. राज्यात इतरत्र कुठेही तो उभारला जाऊ शकतो; पण देशातील हा सर्वांत मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलय. १० मे रोजी ते नाणारचा दौरा करणार असून त्यानंतरच पक्षाची भूमिका जाहीर करेन असं स्पष्ट केलयं.
गैरसमज दूर करू : मुख्यमंत्री
नाणार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. हा प्रकल्प झाला तर यातून १ लाख लोकांना रोजगार मिळेल असंही त्यांनी म्हटलंय.कोकणातल्या लोकांमध्ये नाणार प्रकल्पाबाबत गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. त्यामुळे सगळयांचा विरोध डावलून मुख्यमंत्री यातून कसा मार्ग काढतात याकडं लक्ष वेधलय.
असा आहे प्रकल्प
रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स (आरआरपीसीएल) या तीन लाख कोटी रुपयांच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी अरमाको या सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या भारतीय तेल कंपन्यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जगातील मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये या नाणारच्या प्रकल्पाची गणना होणार असून त्यामुळे भारताच्या खनिज इंधन आणि पेट्रोकेमिकल्सच्या वाढत्या गरजांची पूर्तता होणार आहे.
**
