परिचारकांवर देशद्रोह दाखल करा, अधिवेशनात शिवसेना आक्रमक
मुंबई : सैनिकांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मुद्दयावरून शिवसेना चांगलीच आक्रमक बनली होती. परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली.
मागील आठवडयात आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. याच मुद्दयावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आक्रमक होण्याचे आदेश आमदारांना दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. प्रशांत परिचारक यांना केवळ विधीमंडळातून कायमचे बडतर्फच नव्हे तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. या मुद्यांवरून विरोधकांसह शिवसेनेने गदारोळ घातला, प्रशांत परिचारक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग करीत सरकारचा निषेध केला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येणार नाही असे सांगितले.