डोंबिवलीत नगरसेवकाच्या पत्नीवर पिस्तुल रोखले
डोंबिवली :- डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांच्यावर पिस्तुल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलीय. भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीने रस्ता अडवून ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटलय. पल्लवी पाटील यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरसेवक महेश पाटील आणि नगरसेवक कुणाल पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून सध्या ते अटकेत आहेत. यासंदर्भात नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यांनी या आरोपाचा इन्कार केलाय. आम्ही सर्व कुटूंब लग्न सोहळयासाठी बाहेर गेलेा होतो हा केवळ प्रसिध्दीचा बनाव असल्याचे नगरसेवक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.