तीन वर्षापासून खासदारांच्या घरातील लँडलाईन बंद

बीएसएनएलच्या सेवेविषयी सल्लागार समितीची नाराजी

कल्याण : २०१४ वर्षापासून पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या घरातील लँडलाईन बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वनगा यांनी शुक्रवारी बीएसएनएलच्या बैठकीत दिली. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या कामांचा आढावा आणि पुढील वाटचालीसाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार वनगा यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथील बीएसएनएल निगम कार्यालयात पार पडली. त्यामुळे वनगा यांनी बीएसएनएलला घरचा आहेर दिलाय. यावेळी बीएसएनएलच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कारभारावर यावेळी सर्व सल्लागार समिती सदस्यांनी ताशेरे ओढले.

ग्रामीण पट्ट्यात बीएसएनएल पुरवणार हॉटस्पॉट सुविधा

बीएसएनएलचे भारत जोडो अभियान प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी नेवाळी, श्री मलंगगड, शहापूर, मुरबाड, जव्हार आदी भागात बीएसएनएलने टॉवर उभारण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत मांडला. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यावर हॉटस्पॉट सुविधा पुरवण्याचा तोडगाही डॉ. शिंदे यांनी सुचवला. त्याला सुचनेला अधिका-यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. श्री मलंगगड भागामध्ये २००७ साली बीएसएनएलने लाइन टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, खर्च वाढल्यामुळे २००९ मध्ये हे काम बंद करण्यात आले. याशिवाय अंबरनाथ येथे स्वत:ची जागा असून देखील बीएसएनएलने दुसऱ्याच्या जागेत कार्यालय थाटले आहे आणि त्याचे महिन्याकाठी १ लाख रुपये भाडे देखील बीएसएनएल भरते आहे बीएसएनएलचा असा भोंगळ कारभार सर्वच ठिकाणी सुरू असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत मांडली. सर्वच सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिसेस तसेच, बँकांमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क वापरण्यात येत असून नेटवर्क धीम्या गतीने सुरु असण्याचा मनस्ताप विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि वयोवृद्ध अशा सर्वच स्तरातील नागरिकांना विनाकारण सोसावा लागत आहे याकडे खा. डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधलं. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर,  कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर,    बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक (कल्याण/भिवंडी) ठाकरे, उपमहाव्यवस्थापक श्रीमती भाटीया, शिवसेना गटनेता रमेश जाधव, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, निखील वाळेकर, दशरथ घाडीगावकर, महिला संघटक कविता गावंड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *