डोंबिवली आरक्षण केंद्रावर दलालांची दादागिरी
डोंबिवली- डोंबिवली आरक्षण केंद्रावर दलालांचा सुळसुळाट झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील आरपीएफ अधिकाऱ्याकडे तक्रार केलीय मात्र याकडे प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याने जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिलाय.
रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बळ आणि दलाल यांचे आर्थिक हितसंबध गुंतलेले असल्याने या दलालांवर कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप धात्रक यांनी केलाय. दलालांची मुजोरी मोठया प्रमाणात वाढलीय. मागील आठवड्यात आरक्षणासाठी आलेल्या एका प्रवाशाला आरपीएफ च्या जवानांच्या समक्ष स्टेशन परिसरातील दलालांनी मारहाण केली. दररोज आरक्षणाच्या बाहेर दलालाची गुंडप्रवृत्तीची लोक बसलेली असतात त्यांच्या विरोधात ब्र काढणे देखील कठीण असते. यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिक आणि प्रवाशांनी नगरसेवक धात्रक यांच्याकड़े केल्या होत्या.त्यावेळी त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.परंतु यानंतर ही कोणतीही ठोस कारवाई रेल्वे कडून होत नसल्याने दलालांच्या विरोधात प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा धात्रक यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय.