कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना पकडून देणा-यास एक लाखाचे बक्षीस
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ निष्पापांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना पकडून देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलय. मुंबई पोलिसांनी या आरोपींचे फोटो प्रसिद्ध करीत हे आवाहन केले आहे. २८ डिसेंबरच्या रात्री ही दुर्घटना घडून गेल्यानंतर आठ दिवसांनंतरही आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांना अद्याप पकडू शकलेले नाहीत. वन अबव्ह बारचे तीन आरोपी संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटना घडल्यापासून तिघेही आरोपी फरार झाले आहेत. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे.