गुजरातमध्ये भाजप जिंकली, पण मोदी हरले..
गुजरात : सा-या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी लागले. काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झालं. भाजपने २२ वर्षाची सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं असल तरी १५० जागांचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपचा यशाचा रथ काँग्रेसने ९९ जागांवरच रोखला. भाजपच्या तब्बल १६ जागा घटल्या आहेत. काँग्रेसने ८० जागा मिळविल्यात. या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आलं. त्यामुळे भाजप जिंकली, पण मोदी हरले असेच चित्र स्पष्ट झालं.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपने ९९ तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या इतरांना ६ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ४९.१% तर काँग्रेसला ४१.५% मते मिळालीत. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेची केल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही कसोटी लागली होती. राहुल गांधी यांच्या सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी एकत्रीतपणे मोट बांधीत मोदीपुढं आव्हान उभ केलं होत. त्यामुळे ही निवडणूक मोदींसाठी प्रतिष्ठेची बनली होती. गुजरातमध्ये भाजपचं कमळं फुललं असलं तरी घवघवीत यश मिळवता आलेलं नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याचे दिसून आले. भाजपने विजय मिळवला असल तरी काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमुळे राहुल गांधी यांनी मैदान मारलं आहे. ‘शिवसेनेनं ४१ जागा लढवल्या. पण त्यांना यश मिळालं नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिंकले
राजकोट पश्चिम या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री विजय रुपाणी हे २५ हजाराच्या मताधिक्याने विजयी मिळविला. तसेच मेहसाणा मतदार संघातून उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे ३६८०७ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष जीतूभाई वाघाणी हे भावनगर पश्चिमेतून ५८३२४ मतांनी विजयी झालेत.
भाजपच्या जागा घटल्या, काँग्रेसच्या वाढल्या
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर भाजपला १५० जागा मिळतील असा दावा केला होता. पण भाजपला १०० चा आकडा ही गाठता आलेला नाही. भाजपला मागील निवडणुकीत ११५ जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी भाजपच्या तब्बल १६ जागा घटल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही पण त्यांनी मोदींच्या गडाला चांगलाच हादरा दिला. मागील २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला ६१ जागा आल्या होत्या. यावेळी काँग्रेसला जवळपास १६ जागा वाढल्यात.
तरूण नेते जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर विजयी
गुजरातमध्ये दलित आंदोलनाचा चेहरा असलेले जिग्नेश मेवानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून वडगाममधून निवडणूक लढवली. २० हजाराहून अधिक मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला. तर राधनपूरमतदार संघातून ओबीसी नेता अल्पेश ठाकोर हे सुध्दा विजयी झालेत.
मोदींच्या किल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर मतदार संघात काँग्रेसने विजय मिळविलाय.उंझा मतदार संघात काँग्रेसच्या आशा पटेल या विजयी झाल्यात तर भाजप उमेदवार नारायणभाई पटेल हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे मोदीना जोरदार धक्का मानला जात आहे.
भाजपचा विजय असामान्य : नरेंद्र मोदी
गुजरातचा विजय सामान्य नाही तर असामान्य आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालाचं विश्लेषण केलंय. ‘गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे आभार, त्यांनी विकासाचा मार्ग निवडला, यातूनच सामान्यांच्या समस्यांचं निराकरण होईल. जीएसटीमुळे भाजपचा पराभव होईल अशा अफवा होत्या, महाराष्ट्रात भाजपने जीएसटीनंतरच मोठं यश मिळवलं. उत्तर प्रदेश निवडणूक सुरु होती तेव्हा जीएसटीमुळे पराभव होईल असा दावा करण्यात आला होता, गुजरातमध्येही हीच अफवा पसरवली गेली’, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
पराभवाचा स्वीकार : राहुल गांधी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा स्वीकार केलाय. राहुल यांनी दोन्ही राज्यांमधील नव्या सरकारांना शुभेच्छा देत मतदारांचेही आभार मानले आहेत. ‘द्वेषाच्या विरोधात आपण विवेकाची लढाई लढलो असेही ते म्हणाले.
भाजपच्या विजयात इव्हीएमचा हात : हार्दीक पटेल
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झालाय मात्र या विजयात इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळेच हा विजय झालाय. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केला त्यामुळे भाजपच्या विजयात ईव्हीएमचा हात असल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी केला.
हिमाचल प्रदेशमध्ये कमळ फुललं
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल यांनाही पराभवराचा धक्का बसला. धुमल हिमाचलच्या सुजानपूर मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं राजींदर राणांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे हा पराभव भाजपला धक्का देणारा ठरलाय. हिमाचलमध्ये ६८ जागांचे निकाल जाहीर झाले त्यात भाजपने ४४, काँग्रेस २१ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.