शहरात पांघरली धुक्यांची दुलई..लोकलसेवेलाही फटका
डोंबिवली : काही दिवसांपासून थंडीचा जोर अधिकच वाढलाय. आज सकाळी सातच्या सुमारास डोंबिवली कल्याणसह ठाणे पट्टयात धुक्यांची दुलई पसरली होती. रेल्वे रूळावर दाट धुकं पसरल्याने लोकलसेवा १० ते १५ मिनीटे उशिराने धावत होत्या त्यामुळे सकाळच्यावेळी कामावर निघालेल्या चाकरमण्यांना फटका सहन करावा लागला.
राज्यात थंडीची लाट पसरली असतानाच, दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढलाय. आज सकाळी सात वाजताही शहरात दाट धुकं पसरलं होत. रेल्वे रूळावर दाट धुकं पसरल्याने समोरच्या काही दिसत नव्हत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मोटरमन हळू हळू लोकल चालवित होते. खाडी पट्टयाच्या भागात अधिकच दाट धुके पसरले होते त्यामुळे मोटरमनला गाडी थांबवत अंदाज घेतच लोकल सरकत होती. त्याचा फटका लोकल सेवेला बसल्याने १० ते १५ मिनीटे उशिराने धावत होत्या. लोकसेवेबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडयांनाही याचा फटका सहन करावा लागला.