ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला, तरी हत्येमागील खरा हेतू आणि मुख्य सूत्रधार शोधण्यात ठाणे पोलिसाना अजूनही यश आलेले नाही. २९ सप्टेंबर रोजी कार्यालयात घुसून गोळ्या झाडून व चॉपरने सपासप वार करून पूर्णेकरांचा खून करण्यात आला. या भयंकर हत्याकांडानंतर पोलिसांनी पाच शूटर्सना बेड्या ठोकल्या, पण महिनाभराच्या चौकशीनंतरही पोलिसांच्या पदरात हत्येचे कारण शोधण्यात केवळ ‘शून्य’ यश आले आहे.
या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा थेट आणि गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. हत्येच्या काही तासांपूर्वी आरोपी आणि राजेंद्र शिंदे एकत्र चहा पितानाचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या हवाली केले. इतकेच नव्हे तर हत्येतील पाचवा आरोपी अमित सिंग हा बनावट असून त्यामागे राजेंद्र शिंदेच असल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु, एवढे सबळ पुरावे समोर असतानाही पोलिस केवळ ‘फॉरेन्सिक तपास सुरू आहे’ असे गुळमुळीत उत्तर देऊन हात वर करत आहेत.
मंगळवारी रात्री मुख्य आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा संताप व्यक्त करत संतप्त समर्थकांनी रस्ते अडवून आक्रोश नोंदवला. बुधवारी पुर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. ‘कायदा हातात घेऊ नका’ अशा धमक्या देणारे पोलीस प्रशासन मूळ कटाचा छडा लावण्यात मात्र पूर्णपणे हतबल ठरले आहे. आरोपींना समोरासमोर बसवूनही हत्येचे गूढ उकलत नसल्याने ठाणे पोलिसांच्या तपासावर आणि प्रामाणिकपणावरच आता संशयाची गडद सावली निर्माण झाली आहे.
आज ठाण्यात सर्वपक्षीय ‘एल्गार’; विरोधकांची एकजूट
हत्येच्या ३० दिवसांनंतरही मुख्य आरोपी मोकाट असल्याचा आरोप करत ठाकरे गट, मनसे आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात भव्य सर्वपक्षीय महाआंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात ठाकरे गटाचे प्रमुख नेते, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह स्थानिक विरोधी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिंदे यांच्यावर ठाण्यात येऊन उपमुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा सज्जड दम दिला आहे. यामुळे गुरुवारी ठाण्यात मोठा राजकीय उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे



