कर्जत : “सभा मनसेची म्हणून कर्जतचे इंटरनेट बंद केले? इंटरनेट बंद केले म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? तुमची बुद्धी गहाण पडली असली, तरी अर्ध्या तासात हे भाषण युट्युबवरून अख्खं जग बघेल!” अशा तुफान फटकेबाजी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतच्या सभेत सरकारचे वस्त्रहरण केले. टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी सह्याद्रीत चाललेल्या अमानुष वृक्षतोडीविरोधात बुधवारी ही धडाडणारी सभा पार पडली.

राज ठाकरेंच्या तोफखान्यातील ५ धारदार वार:

  • जंगलाचा अंत्यसंस्कार: “सकाळी जंगलात गेलो, तोडलेल्या झाडांची लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, तो सह्याद्री संपवायला निघालात? शिवरायांचे ‘आज्ञापत्र’ वाचाल की नाही?”
  • दिल्लीचे गुलाम सत्ताधीश: “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केंद्रात शून्य किंमत आहे! सर्व निर्णय दिल्लीतून होतात. गुजरातमधल्या दोघांच्या तालावर नाचणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र नक्कीच नाही.”
  • १५०० रुपयांत लाचारी?: “१५०० रुपये फेकून लोकांची तोंडं बंद केली जात आहेत. निवडणुकीत जाती-धर्मावर मतदान करायचं आणि पुढची ५ वर्षे रडत बसायचं, ही लाचारी कधी सोडणार?”
  • वीज आणि जमिनीचे खाजगीकरण: “सह्याद्रीत असे २३ प्रकल्प लादून तुम्हा स्थानिकांना विस्थापित केले जाणार आहे. महावितरणच्या IPO नंतर तुमच्या घरातील विजेचा दर खाजगी कंपन्या ठरवतील.”
  • ‘जेनझी’ आणि तरुणांना आव्हान: “सर्बियातील ‘जेनझी’ने सत्तापालट करून दाखवला, मग महाराष्ट्रातील तरुण शांत का? हा महाराष्ट्र स्वाभिमानाने पेटून उठणार आहे की लोण्यासारखा थंड बसणार?”

“नेतृत्व तुमचे, मी पाठीशी!”

“मी उद्योगांच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्राचे मरण घडवून विकास नको! महाराष्ट्राचा निर्णय मराठी माणूसच करेल. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत आहे की नाही, हे मला पाहायचंय. लढाईचे नेतृत्व तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी भक्कम उभा आहे,” असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *