विशेष प्रतिनिधी / मुंबई : उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादंगाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस आयुक्तांच्या विशेष विनंतीचा मान राखत ती पोस्ट डिलीट करत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “ज्या हेतूने ती डॉक्युमेंट्री शेअर केली होती, तो देशाच्या प्रबोधनाचा हेतू साध्य झाला असून, एकाधिकारशाहीविरोधात आम्ही पेटवलेला वणवा आता विझणार नाही,” असा इशाराही त्यांनी नव्या पोस्ट मध्ये दिला आहे.

४८ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि प्रचंड प्रतिसाद

नव्या पोस्टमध्ये माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, गौतम अदानी आणि पंतप्रधान यांच्या संबंधांवर व त्यातून उद्योग विश्वावर निर्माण होणाऱ्या प्रभावावर भाटिया यांनी बनवलेली डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केली होती. या व्हिडिओला एकट्या ट्विटरवर (X) ४८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून फेसबुकवरही मोठा प्रतिसाद मिळाला. यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये मुंबईतील शिवतीर्थावरून सादर केलेल्या अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशनमध्येच अदानी समूहाच्या वाढत्या प्रभावावर स्पष्ट भाष्य केले होते आणि त्यातील काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीतही वापरल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले.

“व्यक्तीला विरोध नाही, एकाधिकारशाहीला विरोध!”

आपली भूमिका पुन्हा स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “माझा कोणत्याही एका व्यक्तीला विरोध नाही, तर देशातील एकाधिकारशाहीला विरोध आहे. देशातील पंतप्रधानांनी अनेक उद्योगपती मोठे करावेत, त्यातून देशात रोजगार आणि संपत्ती निर्माण व्हावी, मराठी व भारतीय उद्योगपतींनी जग पादाक्रांत करावे ही आमची इच्छा आहे. परंतु, केवळ एकाचाच लाड करून देशाला धोक्यात आणले जात असेल, तर त्याला आमचा विरोध कायम राहील.”

“डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय!” – सरकारवर कडक टीका

राज्यातील जमिनी ठराविक उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे म्हणाले, “भीमाशंकर येथील शेकडो हेक्टर वनजमीन गुजरातच्या ‘टोरेंट’ कंपनीला देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. महाराष्ट्रातील मौल्यवान वनजमिनी एकामागून एक ठराविक मित्रांच्या घशात घातल्या जात आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि मंत्री आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना गप्प कसे बसू शकतात? सत्तेसमोर इतके शरण जाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या परंपरेला व संस्कृतीला शोभणारे नाही,” असा सवाल त्यांनी केला.

पोलीस प्रशासनाचा आदर म्हणून पोस्ट डिलीट

डॉक्युमेंट्री डिलीट करण्यामागचे कारण सांगताना राज ठाकरे यांनी सांगितले की, “या डॉक्युमेंट्रीमुळे वरिष्ठांच्या पोटात गोळा आला आणि गुपित फुटल्याची भीती निर्माण झाली. त्यातूनच मुंबई पोलीस आयुक्तांमार्फत ती पोस्ट हटवण्याची विनंती करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम दल आहे आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. म्हणून त्यांच्या प्रमुखाच्या विनंतीचा मान राखत मी ती डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट करत आहे.”

“पेटलेला वणवा कायम राहिल”

“पोस्ट डिलीट केली असली तरी जानेवारी २०२६ मध्ये शिवतीर्थावरून एकाधिकारशाहीविरोधात टाकलेली ठिणगी आता वणवा बनली आहे. आमचा लढा असाच सुरू राहील आणि आमचे मूळ प्रेझेंटेशन आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे,” असे ठाम प्रतिपादन राज ठाकरे यांनी शेवटी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *