मनसेच्या भित्र्या, नपुंसक कार्यकर्त्यांचा हल्ला :
संजय निरूपम यांची जहरी टीका
मुंबई : मनसेने काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी तीव्र शब्दात मनसेवर टीका केलीय. ज्यावेळी कार्यालयात कोणीच नव्हते त्यावेळी मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय.
निरुपम हे गुजरातला असून, ट्विट करून त्यांनी हा संताप व्यक्त केलाय. काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली त्या ठिकाणापासून आझाद मैदान पोलीस ठाणे 25 मीटर अंतरावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई न केल्यास आम्हाला जशास तसे उत्तर दयावे लागेल असा इशारा निरुपम यांनी दिलाय.
काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड !: विखे पाटील
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेत्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.