बदलापूर : बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्या सकाळच्या वार्ताहर मोहिनी जाधव यांना अर्वाच्च भाषा वापरणारा बदलापूरचा माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा नेता वामन म्हात्रे याच्यावर अखेर बदलापूर पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वामन म्हात्रे याला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
बदलापुरात साडेतीन वर्षीय दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूरकरांनी रेल्वे रुळावर उतरून आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी तब्ब्ल १० तास आंदोलन केले. एकीकडे संपूर्ण जनता चिमुरडींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती तर, शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना अर्वाच्च भाषा वापरीत अपमानित केले. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. असं वक्तव्य केलं होत. म्हात्रेंच्या या वक्तव्याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला. वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार संघटनाकडून करण्यात आली. अखेर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.