सोलापूर : लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तू १५०० रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते असा इशारा सुप्रिया सुळेंनी रवी राणा याना दिला आहे.
आमदार रवी राणा यांनी आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणची रक्कम ३ हजार करु मात्र, ज्या महिला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० परत घेणार असल्याचं म्हटलं होतं. रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या व्हिडीओ क्लीपचा आवाज लोकांना ऐकवला. तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असं म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे. मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको भावांनी प्रेम दिलं यावरच आम्ही खूश असतो. नको बाबा तुझे १५०० रुपये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
१५०० रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना १५०० रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव, बघते तुझा काय कार्यक्रम करते, ये नही चलेगा अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला. या सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घाणेरडं, गलिच्छ राजकारण सुरु केलं आहे ते बंद केलं पाहिजे. हे सरकार का बदललं पाहिजे, घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला संपवण्यासाठी बदललं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.