मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव हे त्यांच्या नादी लागले आहेत का ? असा प्रश्न मला पडतो.” अनिल देशमुख यांना प्रतिज्ञापत्राद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला होता.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं, अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही.” असा आरोप श्याम मानव  यांनी केला आहे.

 फडणवीस पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावरील झालेले आरोप आमच्या सरकारच्या काळात नाही, तर मविआच्या काळात झाले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले. मुख्य न्यायाधीशांनी अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर करायला लावला आणि मग देशमुख तुरुंगात गेले. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले आहेत. ते दोषमुक्त झालेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *