मराठी पाटय़ांच्या मुद्दावर मनसेचा सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव
कल्याण (सचिन सागरे) : विक्रोळीला दुकानांवर मराठी पाट्या लावण्या संदर्भात पत्रक देताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच मराठी पाटय़ाच्या मुद्यावर मनसे आक्रमक झाली असून कल्याण मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्याण कामगार आयुक्त कार्यालयात जाऊन सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव घातला.
पाच महिन्यापूर्वी मनसे तर्फे निवेदन देण्यात आले होते. अद्याप त्यावर काही कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा धडक दिली. सहाय्यक आयुक्त संतोष भोसले यांना जाब विचारला. दहा दिवसात पूर्तता करु असे आश्वासन मनसेला आयुक्तांच्या मार्फत देण्यात आले आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी मनसेच्या वतीने कल्याण मधील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. यांनतर १५ दिवसांचा कालावधी दुकानदारांना देत १६ मे रोजी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना मनसेने काळे देखील फासले होते. या आंदोलनानंतर दहा दिवसांनी मनसेच्या वतीने या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना निवदेन देत मराठी पाट्या न लावण्याऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी कारण्यात आली होती. मात्र याला ५ महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने सोमवारी मनसेने पुन्हा सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेत घेराव घातला. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
यावर सहाय्यक कामगार आयुक्त संतोष भोसले यांनी यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश भोईर, शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, शहर सहसचिव यतीन जावळे, महिला शहरअध्यक्ष शीतल विखणकर, मीनाक्षी डोईफोडे, विभाग अध्यक्ष राजू राणे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.