उध्दव ठाकरेंचा फडणवीस सरकारवर प्रहार
मुंबई : अंगणवाडी सेविकाच्या आंदोलनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. ठाकरे यांनी आझाद मैदानात आदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
११ सप्टेंबरपासून दोन लाखांवर अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत. बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका आझाद मैदानात जमल्या होत्या. उध्दव ठाकरें यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी इथे नेतृत्त्व करायला आलो नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. ज्या मातांचे आशिर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही. “आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही. तुम्ही खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन त्यांनी दिलं.