डोंबिवली : लोकलमधील वाढती गर्दी ही मोठी समस्या होऊन बसली आहे. या गर्दीमुळे प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. रिया राजगोर या २६ वर्षीय तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची र्दुदैवी घटना घडली आहे. आठवडाभरात डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधील गर्दीने घेतलेला हा दुसरा बळी आहे. लोकलमधील गर्दीवर तोडगा काढण्यास रेल्वे प्रशासन लोकप्रतिनिधी यांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डोंबिवली पूर्वेला राहणारी रिया राजभोर ही कुटुंबासह रहाते. रियाचे ऑफिस ठाणे येथे आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे रियाने ठाणे येथे जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेला जाणारी जलद लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने रिया दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करत होती. गाडीने वेग पकडल्यानंतर गर्दीच्या रेट्याने कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती खाली पडली. रेल्वे प्रवाशांनी आरडाओरडा केला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता रियाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात घडला. यापूर्वी २३ एप्रिलला डोंबिवलीत राहणाऱ्या अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
सकाळच्यावेळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईकडे प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. लोकलमधील गर्दीमुळे डब्ब्यात आत शिरण्यासही जागा नसते्. त्यामुळे अनेकजण लटकून प्रवास करीत असल्याचे दृश्यही नजरेस पडते. त्यामुळे वाढती गर्दीमुळे होणारे बळी थांबणार कधी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.